मुंबई – भारतातील माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) येत्या आर्थिक वर्षात सुमारे १२,००० कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याची माहिती खुद्द कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. कृतिवासन यांनी दिली आहे. ही कपात मुख्यतः मध्यम व वरिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांवर केंद्रित असणार असून, कंपनीला ‘तयार आणि तत्पर’ ठेवण्यासाठी ही गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बदलत्या तांत्रिक गरजांनुसार हे पाऊल उचलल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
टीसीएसमध्ये सध्या ६.१३ लाख कर्मचारी कार्यरत असून त्यातील दोन टक्के म्हणजे जवळपास १२,२०० कर्मचाऱ्यांना नोकऱ्यांवरून कमी केले जाणार आहे. या निर्णयामुळे IT क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून, विशेषतः वरिष्ठ कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. ‘ही कपात AI मुळे नव्हे, तर बदलत्या प्रकल्प गरजांनुसार योग्य माणसांची योग्य ठिकाणी नेमणूक करण्यासाठी आहे’, असे कृतिवासन यांनी स्पष्ट केले.
सध्याच्या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ऑटोमेशनमुळे आयटी उद्योगात नवा अध्याय सुरू झाला आहे. टीसीएसनेही या नव्या तांत्रिक प्रवाहात सामील होत, एआयचा व्यापक अवलंब सुरू केला आहे. परिणामी, जुन्या कार्यपद्धती व पारंपरिक भूमिकांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाशी सुसंगत व्हावे लागणार आहे. कृतिवासन म्हणाले, “आम्ही कर्मचाऱ्यांच्या कौशल्यवृद्धीसाठी सातत्याने गुंतवणूक करत आहोत. पण काही ठिकाणी कर्मचाऱ्यांचे पुनर्विन्यास अपेक्षेप्रमाणे प्रभावी ठरले नाही. त्यामुळे ही कपात अनिवार्य झाली आहे.”
कंपनीच्या या निर्णयाला एआयमुळे वाढलेली कार्यक्षमता व त्यामागचा खर्चकपात याचेही पार्श्वभूमी आहे. जगभरात अनेक कंपन्या नव्या तंत्रज्ञानामुळे नोकऱ्या कमी करत आहेत. विशेषतः मॅन्युअल टेस्टिंगसारख्या कामांमध्ये घट झाली असून, हे काम आता AI द्वारे केले जात आहे. काही विश्लेषकांच्या मते, वरिष्ठ कर्मचाऱ्यांसाठी ही परिस्थिती अधिक गुंतागुंतीची ठरते आहे कारण नव्या कौशल्यात पारंगत होणे त्यांच्यासाठी सोपे नाही.
कंपनीने प्रभावित कर्मचाऱ्यांसाठी सहाय्य योजनेची घोषणा केली असून, त्यामध्ये सन्मानजनक पद्धतीने काम सोडण्याचे पर्याय उपलब्ध करून दिले जातील. यामध्ये वेतनासोबतच, विस्तारित आरोग्य विमा आणि रोजगारासाठी अन्य ठिकाणी मदतीची व्यवस्था यांचा समावेश आहे. बेंच मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातही सुधारणा केली जात असून, प्रकल्पविहीन कर्मचाऱ्यांना नव्या संधी शोधण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
कपातीच्या या घोषणेनंतरही कंपनीने एप्रिल ते जून २०२५ या तिमाहीत ६,०७१ नव्या कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. त्यामुळे टीसीएसचा विस्तार थांबलेला नाही, मात्र भविष्यातील गरजांनुसार कर्मचारी निवड व नियुक्ती प्रक्रिया अधिक कौशल्याधिष्ठित आणि प्रकल्पकेंद्रित असेल, हे निश्चित झाले आहे.
टीसीएसने जाहीर केलेली ही नोकरकपात ‘यातच बरे’ अशी नसून, हा निर्णय देशातील आयटी उद्योगासाठी एक गंभीर संकेत आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून तंत्रज्ञान कंपन्यांनी अशा प्रकारची नोकरकपात मोठ्या प्रमाणावर केली आहे. भारतातही हे वारे वाहू लागले असून, ‘योग्य तंत्रज्ञान-योग्य माणूस’ या समीकरणाला महत्त्व मिळू लागले आहे. याचा अर्थ, पारंपरिक अनुभव व जुन्या कौशल्यांवर आधारित नोकरी सुरक्षिततेचा भ्रम संपुष्टात येत आहे.